Menu

Akole Special

अहमदनगर जिल्ह्यातील, अकोले तालुका म्हणजे भौगोलिक-ऐतिहासिक वारश्याने संपन्न भूमी. भटक्यांची पंढरी हरिश्चंद्रगड, रतनगड, आजोबा पर्वत, अलंग-मदन-कुलंग, विश्रामगड आदी वैभवशाली गडकिल्ले, प्रवरा आढळा मळगंगा नद्यांची सुपीक खोरी; भंडारदरा, घाटघर, निळवंडे धरण, अकोले, राजूर, कोतूळ, समशेरपूर इ. बाजारपेठा, अमृतेश्वर, टाहाकारी जगदंबा ,अगस्ती ऋषी,कोतुळेश्वर, अमृतेश्वर मंदिर तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आणि रंधा धबधबा, सांदण दरी आदी निसर्गाविष्कार प्रसिद्ध पावून वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची रेलचेल असते.

परंतु याच परिसरात निसर्गाचा अद्भुत चमत्कार असलेले एक ठिकाण त्या मानाने खूपच उपेक्षित राहीले ते म्हणजे ''चेमदेव डोंगर''!

सिन्नरहून ठाणगावमार्गे किंवा इगतपुरीहून टाकेदमार्गे खिरविरे गावात गेल्यास सह्याद्रीच्या रांगेतील महाकाळ पर्वताच्या पूर्वेस एकाकी अन पिंडीसारखा दिसणारा चेमदेव डोंगर सहज लक्ष वेधून घेतो. खिरविरेतून चेमदेव पर्यंत पक्का रस्ता आहे.
डोंगराच्या पूर्वेस दोन टेकड्या असून त्यांच्या खिंडीतून पूर्वी दळणवळणाचा मार्ग होता. तशा खुणाही तिथे आढळतात. चेमदेववर वरकरणी मानवी वस्तीच्या खाणाखुणा दिसत नसल्या तरी त्यावरील खोदीव पाण्याचे टाके पाहता तिथे पहाऱ्याची चौकी असण्याची शक्यता आहे. चेमदेव अन टेकडीच्या घळईत वाघोबा दैवत असून वर चढून गेल्यावर आणखी एक वाघोबाचे स्थान आहे. तिथून उजवीकडे गेल्यास खडकात खोदलेले एक लहानसे पाण्याचे टाके आहे. परत माघारी फिरुन डोंगरावरील सुळक्याकडे आल्यावर एक अद्भुत निसर्गाविष्कार बघायला मिळतो.

या सुळक्यास दोन नेढेसदृश आरपार भुयारे (अंदाजे ३०-४०फूट लांब)असून ती एकमेकांना छेदून गेल्याने ✖ आकार तयार झाला आहे. त्यामुळे चारही दिशांना तोंड असलेल्या भुयाराला मध्यभागी केंद्र निर्माण झाला आहे. फक्त एकच व्यक्ती गुडघ्यावर चालत जाऊ शकेल इतक्यातच रुंदीच्या या भुयारात पश्चिमेकडील बाजूला मध्यभागी चेमदेवाचा शेंदूर फासलेला तांदळा आहे. भुयारात प्रवेश करण्यासाठी दक्षिणेकडील तोंडाकडे दगडी पायर्‍या आहेत.
या भुयाराच्या चारही तोंडातून आजूबाजूचा परिसर बघण्याची मजा काही औरच आहे. तसेच यात चारही दिशांनी येणाऱ्या वाऱ्याची झुळूक नक्कीच प्रसन्न करून जाते. पावसाळ्यात तर यातून वेगाने वाहणारे धुक्याचा अनुभव म्हणजे पर्वणीच ठरेल.

सुळक्याच्या माथ्यावर निशान फडकत असुन त्यावरून निळवंडे धरण, पाबरगड, रतनगड, कळसुबाई, शेणित सुळका, महाकाळ पर्वत, विश्रामगड, औंढा, आडकिल्ला असा मोठा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो.
चेमदेव च्या पश्चिम पायथ्याशी देवगावात शुर क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक आहे.

स्तरीय खडकाच्या चिरांना वाऱ्याच्या वेगामुळे क्षरण होऊन ही भुयारे तयार असावीत असेच वाटते.

असा हा नैसर्गिक अविष्कार भटके गिरीप्रेमी पर्यटक यांनी एकदा तरी अनुभवावा असाच आहे.

शब्दांकन- ईश्वर सहाणे
९५०३४०५७५७
प्रतिमा संकलन- बबन शिंदे ८३२९५५१६०९
प्रसिद्धि- सुरींदर वावळे
८०५५२०१४००